गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 25 मार्च 2020 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. यासाठीच जाणून घ्या गुढीपाडवा माहिती…

गुढीपाडवा इतिहास (History of Gudi Padwa In Marathi)

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा (गुढीपाडवा इतिहास) सांगितल्या जातात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरूवाताला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पुजन केले जाऊ लागले. इतिहासात या दिवशी ब्रम्हदेवाने विश्व निर्मिती केली असं वेदात म्हटल्याचा उल्लेख आहे. पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परत आले म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढीपाडवा का साजरा करतात यामागे अनेक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरलं आणि तृतीयेला झालं होतं. म्हणूनच या दिवशी आदिशक्ती पार्वतीची पुजा केली जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व (Gudi Padwa Information in Marathi)

गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे पौराणिक कथेत अनेक संदर्भ सापडत असले तरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. आजच्या आधूनिक युगातही या सणाला ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुडी पाडवा महत्व जाणून घेणं फार गरजेचं आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पुर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरूवात होते. त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. जुनी सुकलेली पानं गळून झाडांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो याचं प्रतिक म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जातात. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. यामुळे पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरं करणं, धान्यातील किड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुनिंबामध्ये अनेक गुण असल्यामुळे आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शरीराला थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्यामुळे आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडवा माहिती माहीत असायला हवी.

1. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. ज्यामधून विजयपताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते.

2. गुढीपाडव्याला करतात पारंपरिक वेशभूषा

गुढीपाडवा हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा सण आहे. शिवाय या दिवसापासून मराठी नवीन वर्षाला सुरूवात होते. सहाजिकच या नवीन वर्षाचे स्वागत पारंपरिक वेशभूषेने केले जाते. महिला या दिवशी खास नऊवारी साडी, नथ, ठुशी असे पारंपरिक दागदागिने घालतात तर पुरुषमंडळी धोती, सलवार, कुर्ता असा पारंपरिक पेहराव करतात.

3. गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढली जाते

महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणीदेखील गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. रस्त्यावर चौकाचौकात मोठमोठया रांगोळ्या काढल्या जातात, पारंपरिक वेशभूषा केली जाते, लोझिम, ढोल ताशे आणि भव्यदिव्य देखावे करून मोठी शोभायात्रा काढली जाते. शहरातील सर्व समाजातील लोक यात सहभाग घेतात आणि मराठी नवीन वर्षाचे स्वागत करतात.

About the author

admin

Leave a Comment

error: Content is protected !!